शिरोळात चांगभलंच्या गजरात श्री मरगुबाई, श्री अंबाबाई, श्री संतुबाई देवींची यात्रा उत्साहात संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
चांगभलं च्या गजरात येथील ग्रामदैवत श्री. मरगुबाई, श्री.अंबाबाई,श्री. संतुबाई, या देवींच्या यात्रा मंगळवारी धार्मिक आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त तिन्ही.मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यात्रेनिमित्त श्री मरगुबाई मंदिराची स्वच्छता करण्यात आली होती. मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरावर विद्युत रोषनाई करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे देवीस महाभिषेक व पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिरात नैवेद्य अर्पण व दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रिघ लागली होती. सकाळी १० वाजल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून श्री मरगुबाई देवीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. पालखी प्रदक्षिणेवेळी भाविकांनी दर्शन घेत देवीची खणा-नारळाने ओटी भरली. पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.श्री मरगुबाई देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यासाठी धनगर समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
कोळी गल्लीत असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराची यात्रेनिमित्त स्वच्छता करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती, नैवेद्य अर्पण करण्यात आला. या ठिकाणीही दर्शन व निवैद्य अर्पण करण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.देवीचा गोंधळ यासह विविध धार्मिक कार्यक्रमंचे आयोजन करण्यात आले होते. येथील कोळी, गोंधळी पुजारी, समाज बांधवांनी या यात्रेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यात्रेनिमित्त श्री संतुबाई मंदिराची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे देवीस अभिषेक, पूजा, महाआरती, नैवेद्य अर्पण करण्यात आला. भाविकांनीही दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी येथील श्री संतुबाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा