शिरोळ तालुक्यातील ७ मार्गावरील वाहतूक ठप्प

 कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुका आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम तालुक्यातील सात प्रमुख बंधाऱ्यांवर झाला असून या मार्गावरील वाहतूक काही दिवसापासून पूर्णतः ठप्प झाली आहे.

सध्या तेरवाड, शिरोळ, राजापूर, कनवाड-म्हैशाळ, दत्तवाड-मलिकवाड, दत्तवाड-एकसंबा आणि कोथळी-समडोळी ही सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांवरून जाणाऱ्या मार्गांवरील वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा परिणाम झाला आहे.

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असून याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या आणि बंधाऱ्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारे तर कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर बंधारे पूर्णतः जलमय झाले आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड आणि दत्तवाड-एकसंबा या बंधाऱ्यांवरील पाणीपातळीही वाढली असून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

या स्थितीमुळे महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यानच्या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. राजापूर-जुगुळ (कर्नाटक) आणि कुरुंदवाड-शिरोळ या बंधाऱ्यांवरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. तसेच राजाराम बंधाऱ्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातही पाणी शिरल्याने तिसरा दक्षिद्वार पार पडला. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी सूचनांचे पालन असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष