अकिवाट मधील टोमॅटो पिकाची कृषी विभागाकडून पाहणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील अकिवाट परिसरातील शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक निकृष्ट रोपांमुळे संपूर्णपणे फसल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे कंपनी व रोपवाटिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून नमुने तपासणीसाठी घेतले असून, तपासणी अहवाल आल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान माजी सरपंच विशाल चौगुले आणि पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक विशाल आवटी यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोखून धरत जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास कंपनीच्या दारात तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच चौगुले यांनी दिला.
टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांनी हमी दिलेल्या रोपवाटिकांमधून रोपे विकत घेतली होती. मात्र, या रोपांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याने शेकडो एकरवरील पीक फसले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील, तक्रार निवारण समितीचे सचिव महेंद्र जगताप, तालुका कृषी अधिकारी जांगले, उपकृषी अधिकारी संजय सुतार, महाबीजचे कृषी क्षेत्र अधिकारी सचिन नवले, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके आणि कृषी सहाय्यक अर्जुन राठोड यांनी अकिवाट येथे भेट देत पंचनामा केला.
या पाहणी दरम्यान कनेरी मठ कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ.पराग तुरखडे यांनी टोमॅटो पिकाचे नमुने तपासणीसाठी संकलित केले. यावेळी बियाणे कंपनीचे व्यावसायिक व्यवस्थापक प्रमोद थोरवे हे देखील उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र संतप्त रोहित दानोळे, नितीन दानोळे, अभिजीत जुगळे, सागर मगदूम, संतोष मगदूम, विद्यासागर दानोळे, आप्पासो दानोळे, सचिन उळागड्डे, विशाल आवटी, नेमिनाथ कागे, सरपंच विशाल चौगुले या संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरले.सचिव महेंद्र जगताप यांनी सांगितले की, "टोमॅटो पिकाचे नमुने तपासणीसाठी कनेरी मठ कृषी विज्ञान केंद्रात पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.अशी मध्यस्थी केल्याने शेतकरी शांत झाले.
कंपनीचे व्यवस्थापक थोरवे यांनी देखील तपासणी अहवालानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील," असे सांगत सांगितले..दरम्यान, रोपवाटिका असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत कचरे, उपाध्यक्ष सुशांत माळी यांच्यासह इतर रोपवाटिका मालकांनी, "शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा