गणेशोत्सवासाठी कुरुंदवाड आगारातर्फे विशेष तीर्थक्षेत्र बससेवा

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविक प्रवाशांचा प्रवास सुलभ व किफायतशीर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कुरुंदवाड आगारातर्फे विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. ही सेवा केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीत मर्यादित असणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी दिली असून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या विशेष बसगाड्या कुरुंदवाडहून थेट मालेगाव, गणपतीपुळे, नारायणगड आणि रत्नागिरी येथे सोडण्यात येणार आहेत. या मार्गासाठी संपूर्ण भाडे ९९० रुपये तर अर्धे भाडे ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी बससेवा १२०० रुपयांपासून उपलब्ध आहे. अष्टविनायक दर्शनासाठी खास बसगाड्या २५०० रुपये (अर्धे भाडे १२५५ रुपये) दराने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय शिर्डी, शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक, जोतिबा, महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), वाई, महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, देहू, आळंदी आणि पुणे या ठिकाणी जाणाऱ्या बससेवांचाही यात समावेश आहे. या सर्व गाड्या कुरुंदवाड आगारातूनच सुरू होणार असून, प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

"गणेशोत्सवात भाविक मोठ्या प्रमाणावर तीर्थस्थळांकडे प्रवास करतात. अशावेळी रा.प. कुरुंदवाड आगाराने घेतलेले हे पाऊल उपयुक्त आणि स्वागतार्ह आहे. या उपक्रमामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे," असे मत प्रवासी जितेंद्र साळुंखे यांनी व्यक्त केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष