बोरगाव येथे मोहरम सण सर्वधर्मीय ऐक्याने शांततेत संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव गावात मोहरम सण सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यंदाही गावातील हिंदू-मुस्लिम नागरिकांनी अत्यंत भक्तिभावाने, शांततेत व उत्साहात मोहरम साजरा केला.
गावातील धनगर गेट, अपराज गेट, कुंभार गेट, कालीगेट, मिरजे गेट, माळी गल्ली, चावडी व बावा ढंग वली दर्गा परिसरात नालपिर पंज्यांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारले होते.
रविवार, दि. ६ जुलै रोजी मोहरमचा मुख्य दिवस असल्याने ढोल-ताशांच्या गजरात नालपिर पंज्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपूर्ण गावातून फिरत श्री क्षेत्र बावा ढंग वली दर्ग्याच्या परिसरात पोहोचली. याठिकाणी पीर पंजांची ‘गाठीभेटी’चा कार्यक्रम पार पडला.
संध्याकाळच्या सत्रात पावसाची रिमझिम सुरू असतानाही, सर्व धर्मीय नागरिकांनी तांबुतावर खारीक, खोबरं, गुलाल, अबीर-बुक्का उधळून पीराचे दर्शन घेतले. मोहरमचा महत्त्वाचा भाग असलेले तांबुत विसर्जन देखील शांततेत पार पडले.
सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलीस ठाण्याच्या वतीने योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किरकोळ वाद वगळता यंदाचा मोहरम सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा