‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ स्पर्धेत हभप ज्ञानेश्वर माने महाराज यांना उपविजेतेपद
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे हभप ज्ञानेश्वर माने महाराज (हेरवाड) यांनी उत्तम सादरीकरण करत उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे २,००० कीर्तनकारांनी सहभाग घेतला होता. ऑडिशन फेरीद्वारे १०८ कीर्तनकारांची निवड करण्यात आली, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून माने महाराजांची निवड झाली. पहिल्या फेरीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवगान व संत उपकार यांचे प्रभावी सादरीकरण केले. या सादरीकरणावर परीक्षक हभप जगन्नाथ पाटील महाराज यांनी त्यांना “महाराष्ट्रातील चाणाक्ष कीर्तनकार” अशी उपमा दिली.
दुसऱ्या फेरीत ७२ कीर्तनकारांमध्ये झालेल्या स्पर्धेत माने महाराजांनी नामस्मरणाचे आध्यात्मिक महत्त्व संत चोखोबारायांच्या उदाहरणातून प्रभावीपणे मांडले. प्रेक्षकांनी त्यांचे सादरीकरण डोळ्यांत पाणी आणणारे आणि मनाला भिडणारे असल्याचे मत व्यक्त केले.
अंतिम फेरीत महाराष्ट्रातील टॉप ३६ कीर्तनकारांमध्ये हभप माने महाराजांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीवर सादर केलेले निरूपण संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे ठरले. त्यांच्या गुरू – वैकुंठवासी विवेकानंद वासकर दादा – यांचे विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून प्रभावीपणे मांडले.
या तिन्ही फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी उपविजेतेपदाचा बहुमान मिळवला. सोनी मराठी व सर्किट हाऊस टीमकडून त्यांना चांदीच्या चिपळ्या देऊन सन्मानित करण्यात आले.
हभप ज्ञानेश्वर माने महाराज हे वैकुंठवासी आप्पासाहेब वासकर फड, पंढरपूर या कीर्तन परंपरेचे पाईक असून, त्यांनी आपल्या सुसंस्कारित व शुद्ध सांप्रदायिक कीर्तनाने राज्यभरात ठसा उमटवला आहे. टॉप ३६ कीर्तनकारांमधून एकाला विजेतेपद तर अन्य निवडक कीर्तनकारांना उपविजेतेपद देऊन गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनी मराठी व झी मराठी या वाहिन्यांनी ज्ञानेश्वर माने महाराजांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या असून, काही दिवसांत होणाऱ्या कीर्तनाच्या वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमासाठी त्यांच्या निवडीचेही अधिकृत घोषण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा