आर्या आमणे जिल्ह्यात प्रथम; गुरुकुल कॉमर्स अकॅडमीचा CA परीक्षेत दैदिप्यमान यश
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन व CA इंटरमिजिएट परीक्षांमध्ये इचलकरंजीतील गुरुकुल कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पुन्हा एकदा संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा अनेक पटीने अधिक यशप्राप्ती करत गुरुकुलने आपली शिस्तबद्ध, विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती अधोरेखित केली आहे.
CA फाउंडेशन परीक्षेत आर्या आमणे हिने ४०० पैकी ३३५ गुण मिळवत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने गणित विषयात ९४ गुण मिळवत विशेष कौतुक मिळवलं आहे. तिच्या यशामुळे इचलकरंजी शहराचा मान उंचावला आहे.
आर्या सोबतच विश्वा नाहर (२६७), संध्या सरडा (२४५), अक्षिता सोमाणी, मितांशी दरक, मनन कसलीवाल, अनिकेत ठोंबरे आणि नवीन डागा या विद्यार्थ्यांनीही फाउंडेशन परीक्षेत यश मिळवले आहे.
CA इंटरमिजिएट परीक्षेत अथर्व चौगुले याने अखिल भारतीय स्तरावर All India Rank 39 मिळवून संस्थेचे आणि शहराचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या या यशामुळे गुरुकुलच्या मार्गदर्शनाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
हर्ष भंडारी आणि रोहित पाल यांनी दोन्ही ग्रुप एकाच प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण केले. तर निहारिका कसलीवाल हिने ग्रुप १ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत संस्थेच्या यशात भर घातली.
यंदा संपूर्ण देशात CA फाउंडेशन परीक्षेचा पासिंग रेट केवळ १५% इतका असताना, गुरुकुल कॉमर्स अकॅडमीने त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक यश मिळवत आपली शैक्षणिक पातळी स्पष्टपणे सिद्ध केली आहे.
गुरुकुलचे अध्यक्ष श्री. गणेश नायकुडे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांचे यश म्हणजे आमच्या शिक्षकांचा परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिस्तबद्ध अभ्यासाचं फलित आहे. हे केवळ निकाल नाहीत, तर ही आमच्या गुणवत्तेची परंपरा आहे. अनुभवी प्राध्यापक, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि परीक्षा-केन्द्रित अभ्यासपद्धती यामुळे गुरुकुल कॉमर्स अकॅडमी ही इचलकरंजीसह आसपासच्या भागांतील विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स शिक्षणाची सर्वोच्च आणि विश्वसनीय संस्था म्हणून नावारूपास आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा