गणेशवाडीतील गणेशोत्सवाला स्वांतत्र्यपुर्व ऐतिहासिक वारसा
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील गणेशोत्सवाला स्वांतत्र्यपुर्व,ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे सन १९२३ मध्ये स्थापन झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोस्तव संस्थेला यावर्षी १०२ पुर्ण झाली आहेत.आजतागायत येथे पारंपारिक पध्दतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो.
सन १९१६ चा काळ.सारा देश स्वांतत्र्यांच्या चळवळीने पेटुन उठला होता. अशावेळी देव,देश अन धर्माची शिकवण देण्यासाठी गणेशवाडीत लोकसेवा संघ वाचनालय व व्यायामशाळा स्थापन झाली.
लोकमान्य टिळक कर्नाटक दौर्यावर असताना कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे यांच्या प्रयत्नाने त्यांना संघाने गणेशवाडीत आणले.सन १९१७ मध्ये येथे टिळकांची मोठी सभा झाली.
अदांजे तीन हजाराहुन अधिक लोक या सभेस उपस्थित होते.यावेळी गणेशवाडीकरांनी स्वांतत्र्य चळवळीस १५० रुपयाची देणगीही दिली.या भेटीत लोकमान्य टिळकांनी लोकसेवासंघास गणेशोत्सवाची प्रेरणा दिली.यावेळी संघाचे अध्यक्ष असलेले श्रीपाद मास्तर मराठे यांच्या पुढाकाराने वाचनालयाच्या कार्यालयात गणेशवाडीचा पहिला गणेशोत्सव साजरा झाला.तीन- चार वर्षे संघामध्ये गणेशोत्सव साजरा झाला. सन १९२३ मध्ये गणेशवाडीत याला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे,स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळावे,स्वांतत्र्यांच्या प्रेरणेने गावातील तरुण एकत्र यावेत यासाठी हा उत्सव सार्वजनिक केला.
सन १९२३ मध्ये गावातील मुख्य चौकात गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या नावे सुरु करण्यात आला.अल्पावधीतच या उत्सवास भव्य स्वरुप प्राप्त झाले.सारा गाव एक झाला.लेझीम,सभा,मेळावे,नाटक यांनी सारा गाव दुमदुमुन गेला.
१९५० ते १९८० च्या दशकात विविध सामाजिक,कौटुबिंक नाटकांनी हा उत्सव वेगळ्याच उत्तुंग अशा ऊंचीवर नेऊन ठेवला.
गणेशवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मेळा पथकांनी पुण्यातील उत्सवही गाजवला.
अँड.राघवेंद्र गोरवाडे,आप्पासाहेब गावडे,चिंतामणी भट आणि संस्थेचे सर्व कार्यकर्ते त्याच वेळच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवेची भावना जोपासत त्याच उत्साहात आजही पांरपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
पहिला गणेशोत्सव ज्या मखरात साजरा झाला.ते मखर लोकसेवा संघाने आजही सुस्थितीत जतन करुन ठेवले आहे.
लोकसेवा संघ आजही सर्व परपंरा,गावातील सांस्कृतिक ,राष्ट्रीय सेवेचा,राष्ट्र भक्तीचा वारसा जपत गणेशोत्सव साजरा करतो.याचा सार्थ अभिमान गावास व संस्थेस आहे.
प्रत्येक घराघरात,प्रत्येक व्यक्तीला देव,देश अन धर्माची शिकवण देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातुन करण्यात आले आहे.हाच वारसा जपत आजही अनेक संस्था ठामपणे उभ्या आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील सुमारे २५ गणेश मंडळे स्वागत कमानीच्या माध्यमातुन विविध सामाजिक संदेश देत देव,देश आणि धर्मसेवेचे कार्य निष्ठेने बजावत आहेत.
सन १९२३ मध्ये स्थापना झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला सन २०२३ मध्ये १०० वर्षे पुर्ण झाली.या शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमासह महिलासाठी विशेष कार्यक्रम,मान्यवरांचे किर्तन,प्रबोधनात्मक व्याख्यान,भक्तीगीते,महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सवानिमित्त ही संस्था कोणत्याही स्वरुपाची गाववर्गणी गोळा करीत नाही.जे काही भक्त,भाविक स्वइच्छेने देणगी देतात त्यामधुनच गणेशोत्सव भक्तीमय वातावरणात,उत्साहाने साजरा केला जातो.
संस्थेच्या "श्रीं"ची मुर्ती ही पर्यावरणपुरक शाडुच्या मातीपासुन बनविलेली असते. "श्रीं"चे आगमन व विसर्जन हे पालखीतुनच केले जाते.यामुळे पारंपारिकतेचा वारसा आजही जपला जात आहे.
श्री.बळवंत गोरवाडे, गणेशवाडी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा