हेरलेत कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्क
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले तालुक्यातील हेरलेतील गावातील काही भागात कावीळ साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व ग्रामपंचायत यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली. आज हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार व साथ रोग नियंत्रण कक्ष कोल्हापूर येथील डॉ रेवडेकर व डॉ ताऊशी यांच्या आरोग्य पथकाने गावात भेट देऊन दूषित पाण्याच्या दगडी टाकीची पाहणी केली. तसेच या पाणी टाकीमधील पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राकडील 10 आरोग्य पथकांना संपूर्ण गावचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या व प्रत्यक्ष ज्या ठिकाणाहून पाणी दूषित होते त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात येऊ नये अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 10 पथकानी आरोग्यसेवक, आशा कर्मचारी यांच्या मदतीने संपूर्ण गावामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले. यामध्ये गावातील 1963 कुटुंबांतील 9195 व्यक्तींचे सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने, काविळीच्या संशयित रुग्णांचे व गरोदर मातांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले.या सर्वेक्षनामध्ये 22 कावीळ रुग्ण आढळून आले. तसेच गावातील खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधून किती रुग्ण दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत याची माहिती घेतली. ग्रामपंचायतीने जेसीबी मशीनने युद्धपातळीवर गावातील कचरा उठावाचे काम सुरू करून अस्वच्छ असणारी ठिकाणे स्वच्छ करण्यास सुरुवात केली. गावातलावातील दूषित पाणी न सोडता नदीचे पाणी सोडण्यास आजपासून सुरुवात केली.दूषित जलस्तोत्र बंद करून ग्रामस्थांनी यातील पाणी पिऊ नये असे सूचना फलक लावले. तसेच गावातील दूषित पाण्याच्या साठ्यात ऑइल फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायती मार्फत प्रत्येक प्रभागात ग्रामस्थांनी पाणी गाळून व उखळून पिण्यासाठी दवंडी देण्यास सुरुवात केली. गावातील सर्व अंगणवाडी मध्ये पाणी शुद्धीकरनासाठी ग्रामस्थांना मेडिकलोअर उपलब्ध करून देण्यात आले.तसेच दूषित पाणी साठ्याजवळील स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील, डॉ. धनंजय महाडिक, डॉ. नीरज भवाने, ग्रामपंचायत अधिकारी बी. एस. कांबळे, आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे, श्रेणिक कोथळे, रोहित पाटील, गणेश पाटील, विजय गोल्हार यांचेसह आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा