हेरवाडच्या मुस्तकीम जमादारची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सुवर्ण कामगिरी

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील हेरवाड हायस्कूलचा विद्यार्थी कु. मुस्तकीम हसन जमादार याने नुकतीच इचलकरंजी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १७ वर्षाखालील गटामध्ये त्याने १०० मीटर व २०० मीटर बटरफ्लाय प्रकारासह २०० मीटर मिडले या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या तिहेरी सुवर्ण कामगिरीमुळे त्याची निवड आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.

मुस्तकीमच्या या यशामुळे हेरवाड व परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरून मिळालेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे त्याने ही यशस्वी झेप घेतली. त्याला प्रशिक्षक श्री. संदीप पाटील सर यांचे कसून प्रशिक्षण, तसेच संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सेक्रेटरी अजित पाटील, वडील श्री. हसन जमादार, क्रीडा शिक्षक अजित दिवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

याशिवाय मुख्याध्यापक श्री. प्रकाश मोहिते, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सतत प्रोत्साहन दिल्याने मुस्तकीमने आत्मविश्वासाने ही कामगिरी केली. त्याच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे त्याने जिल्हास्तरीय पातळीवर शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही तो यश संपादन करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावातील अनेक सामाजिक संस्था, पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी मुस्तकीमचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुस्तकीमच्या या तिहेरी सुवर्ण कामगिरीने हेरवाडचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक आणखी उंचावला असून तरुण पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष