रेकॉर्डवरील ७४ गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहिम राबवली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जयसिंगपूर पोलीस उपविभागीय स्तरावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिरोळ पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले व वडगाव पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी झालेल्या या विशेष कॅम्पमध्ये शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेले ७४ रेकॉर्डवरील आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी सर्व आरोपींना आगामी सणासुदीच्या काळात कायद्याचे पालन करण्यास व गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या. तसेच जर यापुढे कोणत्याही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यास मोका, हद्दपारी व एमपीडीए सारख्या कठोर कायद्याअंतर्गत थेट कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.

सर्व आरोपींकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अन्वये वैयक्तिक जात मुचलके घेण्यात आले. त्याचबरोबर दोन प्रतिष्ठित व्यक्तींना जामीनदार ठेवून, चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र मा. अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.

या कारवाईमुळे आरोपींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाल्याचे दिसून आले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत व सुरक्षिततेत पार पडण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व पोलिस प्रशासनाबद्दल विश्वास वाढला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष