योग्य संस्कार हेच समाजनिर्मितीचे भांडवल : नितिन बानुगडे पाटील

 हेरवाड येथे नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड (ता. शिरोळ) येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी ग्रामस्थ आणि युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, त्यागमूल्यांचे व आदर्श कार्याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वाणीमधून इतिहासातील प्रेरणादायी विचार, समाजघडविण्याचे संदेश व पालकांनी आपल्या पाल्यांना कसे घडवावे याची उदाहरणे देत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे तरुण पिढीला शिवचरित्रातून जीवनमूल्ये स्वीकारून सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या वकृत्वशैलीमुळे हे व्याख्यान गावाच्या सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणारे व युवकांना योग्य दिशा देणारे ठरले.

या व्याख्यानासाठी रविवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ, मान्यवर व तरुण उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत समाजनिर्मितीचे धडे पटवून दिले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पिढीने आपल्या पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे. पालकांनी मुलांमध्ये संस्कार व शौर्याचे धडे रुजवले तरच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

त्यांनी आपल्या व्याख्यानातून उदाहरणांच्या आधारे युवकांना उद्देशून सांगितले की, शिवाजी महाराज झाले कारण त्यांच्या आई जिजाऊ होत्या. त्या आईसारखी जिद्द, मूल्ये आणि संस्कार जर प्रत्येक कुटुंबाने दिले, तर नव्या पिढीला समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. त्यांच्या या विचारांना उपस्थित युवकांकडून दाद मिळाली.

व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी इतिहास फक्त स्मरणार्थ ठेवण्यापेक्षा त्यातून मार्गदर्शन घेणे अधिक महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले नेतृत्व, त्याग आणि शौर्य ही मूल्ये आजच्या काळात तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे तरुण पिढीला आत्मविश्वास, ध्येयवेड आणि समाजकार्याची प्रेरणा मिळू शकते, असा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच भरत पवार, आर.बी. पाटील, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, प्रथमेश पाटील, राजेंद्र माळी, ग्रामविकास अधिकारी महालिंग अकिवाटे, अप्पासो मुल्ला, समीर दानवाडे, वैभव पाटील, बंडू बरगाले, सुनील देबाजे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही व्याख्यानमाला गावातील सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासोबतच युवकांना योग्य दिशा देणारी ठरली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष