पुरामुळे कुरुंदवाड आगार स्थलांतराच्या तयारीत ; ४६ बसेस शिरोळ येथे हलणार

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या महापुराच्या पाण्याचा फटका थेट कुरुंदवाड आगारालाही बसला असून आगार परिसरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आगार प्रशासनाने तातडीने स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.

महापुराचे पाणी आगाराच्या हद्दीत शिरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आगारातील बसेस, डेपोमधील साहित्य तसेच महत्वाच्या कागदपत्रांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. आगारप्रमुख नामदेव पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारातील तब्बल ४६ बसेस शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात येणार आहेत.

पूरस्थिती अनपेक्षित असल्याने बसेस सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक ठरले आहे. अन्यथा पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. इतर महत्वाचे साहित्य बांधून ठेवण्यात आले असून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पूरामुळे कुरुंदवाड शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या सूचनांनुसार नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगाराचे स्थलांतर ही पूरग्रस्त भागातील गंभीर परिस्थितीची जाणीव करून देणारी बाब ठरली आहे. पुढील काही दिवस पाणीपातळीतील वाढ लक्षात घेऊन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष