कुरुंदवाड बाप्पामय : राजवाडा ते मशिदींपर्यंत दुमदुमला गणेशोत्सव.

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कुरुंदवाड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल व फुलांच्या उधळणीने शहर दुमदुमले. पटवर्धन संस्थान सरकारचा ऐतिहासिक दीड दिवसाचा गणपती तसेच राजवाडा, गणेश मंदिर, पाच मशिदी व सार्वजनिक मंडळात विधीवत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.

      गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी महिलांसह पुरुष भक्तांची लक्षणीय गर्दी उसळली होती. राजवाड्यातील दोन शतकांहून अधिक काळ अखंडित सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही पटवर्धन सरकार परिवाराने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्रीमंत भालचंद्रराव चिंतामणराव पटवर्धन सरकार, राणी सरकार, श्रीमंत राजकुमार रघुराजे भालचंद्रराव पटवर्धन व श्रीमंत राजकुमारी राजश्रीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते गणेशपूजन पार पडले.

      पालखी मिरवणुकीच्या वेळी कुंभार गल्ली, मारुती चौक, बाजारपेठ परिसर भक्तांच्या जयघोषांनी फुलून गेला. गर्दीचा मोठा ओघ पाहता पोलिसांनी शिवतीर्थ, सरकारी दवाखाना, दर्गा चौक व बाजारपेठेत वाहतूक बंदी घालून शिस्तबद्ध नियोजन केले. विशेष म्हणजे, १५ ते २० कैकाडी-कोरवी मिनी बँड पथकांनी सकाळपासूनच आपल्या वादनकौशल्याची सुरेल मैफल रंगवून पेठेत उत्सवी रंगत वाढवली.

     शहरातील कुडेखान मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशीद या पाच मशिदींमध्ये तसेच गणेश मंदिर व सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तिभावाने प्रतिष्ठापना झाली. याशिवाय कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व सागर पवार यांच्या हस्ते गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

    पालिका प्रशासनाने शहरात स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली होती तर पोलिसांनी वाहतूक आराखडा आखून चोख बंदोबस्त ठेवला. सर्वत्र गणेशमय वातावरण निर्माण होऊन कुरुंदवाड नगरी खऱ्या अर्थाने "बाप्पामय" झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष