प्रोत्साहन पर अनुदान द्या अन्यथा टाळे ठोका आंदोलन : विश्वास बालिघाटे
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शासनाने नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान शासनाने जाहीर केले होते. मात्र, गेल्या 6 वर्षापासून आम्हाला अनुदान मिळाले नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील अनुदान न मिळाल्यामुळे तात्काळ आमच्या हक्काचे अनुदान द्या, अन्यथा शिरोळ येथील निबंधक कार्यालयाला आंदोलन असा इशारा निवेदनाद्वारे शेतकर्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र शासनाने 2019 साली नियमीत कर्ज भरणार्या पात्र शेतकर्यांना 50 हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते. मात्र, शिरढोण (ता.शिरोळ) येथील विश्वास बालीघाटे, अमोल चौधरी, श्रीकांत पुजारी, नानासो मगदूम, विजय बिरोजे, रोहित चौगुले या शेतकर्यांना गेल्या सहा वर्षापासून प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही.
गेल्या 5 ते 6 वर्षापासून सतत पाठपुरावा करीत असून शिरोळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालय, कोल्हापूर येथील डीडीआर कार्यालय यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलन केले. तरीही आमचे अनुदान मिळाले नाही. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या हक्काचे प्रोत्साहनपर अनुदान रक्कम न मिळाल्यास गुरुवार (दि.18) रोजी शिरोळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती महसूल कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय व शिरोळ पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा