जयसिंगपूर पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम : मतिमंद युवक सुरक्षित नातेवाईकांकडे

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 2.30 वाजण्याच्या सुमारास उदगाव बायपास रोडवर गैबान कन्स्ट्रक्शनकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. या दरम्यान रस्त्याने भटकत आलेल्या एका मतिमंद युवकाला कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता त्या युवकाला ताब्यात घेतले आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणून पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर पाटील यांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपले नाव आदेश जितेंद्र भोसले (वय 18 वर्षे अंदाजे) असे सांगितले. मात्र गावाचे नाव किंवा पत्ता सांगण्यास तो असमर्थ ठरला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश भोसले यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले.

यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. युवकाचा फोटो उदगाव, उमळवाड, कोथळी परिसरातील पोलीस पाटील यांना तसेच पोलिस ठाण्यांच्या व्हॉट्सअॅप गटावर पाठविण्यात आला. यासोबतच विश्रामबाग पोलिस ठाणे, सांगली यांच्याशी संपर्क साधून माहिती पुरविण्यात आली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाची ओळख पटली. आदेश भोसले यांचे नातेवाईक — मावशी प्रीती काळे (रा. विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली) आणि मामा अंकुश मधुकर मराठे (रा. विश्रामबाग, सांगली) यांना पोलिसांनी माहिती देऊन संपर्क साधला.

यानंतर आदेश भोसले यांना त्यांच्या मावशी व मामांसमोर सुरक्षितरित्या आणून दिले गेले. या मोहिमेत उपनिरीक्षक प्रविण माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्ने, पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल आम्रपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण जाधव यांनी विशेष योगदान दिले.

जयसिंगपूर पोलिसांच्या या तात्काळ आणि जबाबदार कार्यवाहीमुळे एक मतिमंद युवक हरवून न जाता नातेवाईकांच्या ताब्यात परत मिळाला. आदेश भोसले यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, या कृतीमुळे पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष