व्ही-बीएसएल कंपनीचा मुख्य सूत्रधार विजय जगदाळे कर्नाटकातून अटक


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल 62 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्ही-बीएसएल इंडिया प्रा. लि. कंपनीचा मुख्य सूत्रधार व मॅनेजिंग डायरेक्टर विजय नाथा जगदाळे (वय 40, रा. जयसिंगपूर) याला कर्नाटकातील जमखंडी येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.

फिर्यादी उत्तम दत्तात्रय निकम (रा. पाचगाव, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे विविध कलम तसेच एमपीआयडी कायदा 2008 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. 17 मे 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत जयसिंगपूरमधील आदिसागर अपार्टमेंट येथील कंपनीच्या कार्यालयातून तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली गेली.

कंपनीचे प्रमुख विजय जगदाळे, संचालक नंदा जगदाळे व एजंट सचिन उदगावे, सलीम आळतेकर, संकेत सुर्यवंशी यांनी आयुर्वेदिक औषधे, पेये व दैनंदिन वापरातील वस्तू विक्रीसाठी फ्रँचायसी देण्याचे आश्वासन दिले. त्याबरोबर दुकानभाडे, कामगारांचा पगार व 30% नफा परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूकदारांना भुलवले. मात्र प्रत्यक्षात कराराप्रमाणे कोणताही परतावा न देता मूळ रक्कमही न परतवल्याने तब्बल 62,85,697/- रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी जमखंडी येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून विजय जगदाळे याला अटक केली. 10 सप्टेंबर रोजी अटक करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले व 11 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार, महिला पोहेकॉ स्मिता कांबळे व पोलीस नाईक रुपेश कोळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष