हेरवाडमध्ये शुक्रवारी श्री संतुबाई देवीची सामुदायिक कुंकुमार्चन पूजा

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावाचे ग्रामदैवत, जागृत श्रद्धास्थान आणि असंख्य भक्तांच्या कुलस्वामिनी असलेल्या श्री संतुबाई देवीची सामुदायिक कुंकुमार्चन पूजा शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री संतुबाई मंदिरात पार पडणार आहे. या निमित्ताने गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संतुबाई नवरात्रोत्सव मंडळ, हेरवाड तसेच समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कुंकुमार्चन विधीची सुरुवात देवीच्या नामजपाने होणार असून, भक्त महिला देवीच्या चरणांपासून डोक्यापर्यंत चिमूटभर कुंकू वाहतील. या वेळी देवीचे स्तोत्र पठण, सहस्त्रनाम स्मरण तसेच श्रीयंत्र किंवा मूर्तीवर कुंकू अर्पण करण्याचा पारंपरिक विधी पार पडेल. देवीला कुंकूने ‘स्रान’ घालून पूजा संपन्न होईल.

कुंकुमार्चनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे मानले जाते. लाल रंग शक्तीचे प्रतीक असून, कुंकुमार्चनामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. कार्यसिद्धी, गृहशांती आणि इच्छापूर्तीसाठी नवरात्रोत्सव काळात विशेषतः अष्टमी व नवमीला हा विधी मोठ्या भक्तिभावाने केला जातो.

पूजेसाठी महिलांनी आपल्या सोबत आवश्यक साहित्य आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये कुंकू, हळद, अक्षता, गंध, तुपाचा दिवा, उदबत्ती, फुले, ताट, सुपारी, फळ, विड्याची पाने, पळी, भांडे, ताम्हण, तांब्या तसेच पंचामृताचा समावेश आहे.

ग्रामदैवत संतुबाई देवीच्या सामुदायिक कुंकुमार्चन पूजेमुळे गावात भक्तिभाव, एकोपा आणि नवरात्रीचा उत्साह अधिकच वृद्धिंगत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष