नवी कार्यपद्धती, नागरीकांच्यात समाधानाची लाट ; दालन संस्कृती” संपुष्टात येऊन “लोकसंपर्क संस्कृती
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षांपासून कुरुंदवाड नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाचा दरवाजा नागरिकांसाठी अक्षरशः बंदच असल्याची तक्रार होती. नागरिक आपल्या समस्या, अडचणी किंवा तक्रारी घेऊन गेल्यास “व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू आहे”, “बैठक चालू आहे”, “थोड्या वेळाने या” अशी कारणे देत नागरिकांना दालनाबाहेर थांबवले जायचे. परिणामी, अनेकांना तासन्तास विनाकारण थांबावे लागत होते. वेळेचा अपव्यय आणि कामाविना ताटकळणे ही नागरिकांची नियती झाली होती.
मात्र, नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी ही पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी “मुख्याधिकाऱ्यांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले राहील” असा निर्णय घेतला. आता नागरिकांना ना परवानगी चिठ्ठी लागते, ना आत जाण्यासाठी कोणताही अडथळा. कोणीही आपली समस्या, अडचण किंवा तक्रार थेट मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडू शकतो.
मनोजकुमार देसाई यांनी कामकाजात पारदर्शकता आणण्यावर भर देत नागरिकांना केंद्रस्थानी ठेवणारी कार्यशैली स्वीकारली आहे. त्यांच्या या खुल्या दालन धोरणामुळे नागरिकांना त्वरित प्रतिसाद मिळत असून समस्या तत्काळ सोडवल्या जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले छोटे-मोठे विषय त्यांच्या थेट हस्तक्षेपाने मार्गी लागले आहेत.
यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत असून, “आता आमचं ऐकून घेतलं जातं” अशी भावना निर्माण झाली आहे. नगरपरिषदेतील वातावरणात सकारात्मक बदल जाणवत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही जबाबदारीची जाणीव वाढल्याचे दिसून येत आहे.
मुख्याधिकारी देसाई यांच्या या कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील “दालन संस्कृती” संपुष्टात येऊन “लोकसंपर्क संस्कृती” निर्माण होत आहे. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत खुलेपणाने काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांबद्दल सर्वसामान्यांपासून ते जनप्रतिनिधींपर्यंत सर्वत्र कौतुकाचीच चर्चा सुरू आहे.
अनेक वर्षांपासून बंद राहिलेला दरवाजा आता केवळ उघडाच नाही, तर लोकांच्या विश्वासाचा प्रवेशद्वार बनला आहे — हा खरा बदल आहे, असे नागरिक सांगत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा