ऊस वाहतूक करणारे वाहन अडवल्याने आंदोलन अंकुश व कारखाना समर्थकांच्या झटापट
रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर मिळावा व मागील २०० रुपये मिळावे यासाठी आंदोलन अंकुशच्यावतीने आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ऊस वाहतूक करणारी वाहने शिरोळ येथील शिवाजी चौकात आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी दत्त कारखाना समर्थक व कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर रात्री उशिरापर्यंत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व कार्यकर्ते यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू होते.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम गुरुवारी सुरू करण्यात आला आहे. तसेच इतर कारखान्याचाही ऊस वाहतूक ठिकठिकाणी तुरळक प्रमाणात सुरू होती. शुक्रवारी सकाळी अर्जुनवाड येथील तोडी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी बंद पडल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास शिरोळ येथून दत्त कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी वाहने जात होती. यावेळी शिवाजी चौक येथे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांनी वाहने अडवली. यावेळी दत्त कारखान्याचे समर्थक व आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांना कारखाना समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केला आहे. दरम्यान, धनाजी चुडमुंगे यांनी ऊस वाहतूक रोखण्यासाठी शिरोळ येथील घालवाड फाटा येथे रस्त्यावर ठिय्या मांडला, रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते रस्त्यावर बसून होते. यावेळी शिरोळ पोलीस ठाण्यामार्फत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दत्त कारखान्याने ३४०० रुपये प्रति टन उसाचा दर जाहीर केला आहे. हा दर ज्या शेतकऱ्यांना परवडतो त्या शेतकऱ्यांनी तोडी घेतल्या आहेत. त्यांचा ऊस कारखान्याला येत आहे त्यामुळे त्यांचे ऊस आडून शेतकऱ्यांचे व वाहतूकदारांचे नुकसान करू नका असे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो यावेळी अंकुशच्या कार्यकर्त्यांबरोबर बाचाबाची झाली.
- निलेश गावडे, दत्त कारखाना समर्थक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा