ऊस दरवाढ व धनाजी चुडमुंगे हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड उद्या कुरुंदवाड बंद
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे शेतकरी नेते धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांना ऊसाचा दर प्रति टन ३७७० रुपये मिळावा या प्रमुख मागणीसाठी कुरुंदवाड शहर बंदची हाक देण्यात आली आहे. हा निर्णय पालिका चौकातील हनुमान मंदिरात शनिवारी (दि. २ नोव्हेंबर) झालेल्या सर्वपक्षीय व शेतकरी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, माजी नगरसेवक राजू आवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत पवार, काँग्रेसचे सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता सर्व शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पालिका चौकात एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तेथे प्रथम धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध सभेचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर शहरातून निषेध रॅली काढण्यात येणार असून, रॅलीनंतर पालिका चौकातच ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना ऊस दराच्या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा पुढील काळात तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला.
या बैठकीत शिवसेना उबाठा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), काँग्रेस पक्ष, तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव रोडे, गोपाळ चव्हाण, सर्जेराव बाबर, बंडू उमडाळे, बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, आप्पासाहेब गावडे, बापूसाहेब जोंग, केरबा प्रधाने, विठोबा कोळेकर, चंद्रकांत आलासे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा