हेरवाडमध्ये ४ नोव्हेंबरला तंटामुक्त अध्यक्ष निवड
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मौजे हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
सभेत शासनाच्या विविध परिपत्रकांचे वाचन, २०२६-२७ चे अंदाजपत्रक, प्रधानमंत्री आवास योजना, सामाजिक अंकेक्षण, १५ वा वित्त आयोगाचा आराखडा, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या विषयांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड व समिती पुनर्गठन हा या ग्रामसभेतील प्रमुख विषय ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीकडे आपले अर्ज सादर करावेत. अर्जासोबत कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा वर्तणुकीचा दाखला जोडणे अनिवार्य आहे, असे सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या परवानगीने आयत्यावेळी उद्भवणाऱ्या विषयांवरही सभेत विचार केला जाणार आहे. गावाच्या विकास, पारदर्शकता आणि शांतीसाठी ही ग्रामसभा महत्त्वाची ठरणार असल्याने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा