जयसिंगपूर शहरात १८१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क

जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. याची दखल घेऊन जयसिंगपूर नगरपरिषदेकडून ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम जोमात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर १९५ भटकी कुत्री पकडण्यात आली असून, त्यापैकी १८१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ही मोहीम जयसिंगपूर नगरपरिषद आणि ‘आसरा ॲनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशन’, बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केली आहे.

भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसांपासून शहरात नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. लहान बालकं, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांच्यावर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली.

या मोहिमेत ८ कुत्रे पकडणारे कर्मचारी (कॅचर) आणि २ पशुवैद्यकीय अधिकारी अशा एकूण १० जणांचे पथक काम करत आहे. पथकाकडे विशेष डॉग व्हॅन असून, दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केले जात आहे.

मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नांदणी रोड मच्छी मार्केट परिसर, कोल्हापूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्र, क्रांती चौक, नांदणी नाका, डवरी सोसायटी, शाहूनगर गणपती मंदिर परिसर, जैन बस्ती, मुजावर गल्ली, शिवशक्ती कॉलनी, राजीव गांधी नगर गल्ली क्र. ६, दसरा चौक, शिरोळ वाडी रोड, प्रकाश सोसायटी, यादव नगर, रेल्वे स्टेशन परिसर, लक्ष्मी रोड गल्ली क्र. १९, बसस्थानक परिसर, समडोळे मळा, राम नगर आणि चांद तारा मशीद परिसर या ठिकाणी मोहीम पार पडली आहे.

नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मोहिमेदरम्यान कुत्रे पकडणाऱ्या पथकास सहकार्य करावे, मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि रेबीजसारख्या रोगांचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले. जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष