मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क : संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार सर्व कामे येत्या 10 जून पूर्वी पूर्ण करावीत. मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, पुर परिस्थितीमुळे जीवित अथवा वित्त हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पूरप्रवण गावांमधील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस त्या-त्या गावांमध्ये तैनात ठेवाव्यात. या बसेस सुस्थितीत असल्याची खात्री करावी, जेणेकरुन त्या पावसाच्या पाण्याने बंद पडणार नाहीत. रुग्ण...